Sunday, 5 April 2015

गोष्ट तंबाखूची....!



                                                                     तंबाखू मूळची भारतातली नाही. पोर्तुगीजांनी सोळाव्या शतकात भारतात आणली आणि ते पीक इतकं फोफावलं की, तंबाखू उत्पादनात भारत तिसर्या क्रमांकावर आहे. जगात सर्वात जास्त तंबाखू निर्यात करणारा देश म्हणून अग्रस्थानी आहे.
                                                                    तंबाखूच्या शेतीला सर्वात सुरक्षित शेती मानली जातं. खतपाणी दिलं की ते पीक वाढतं आणि प्रचंड  नफा मिळवून देतं. त्यातली अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे तंबाखूच्या शेताला कुंपणाची अजिबात गरज नसते. ना जनावरं पीक खातात ना पक्षी तोंड लावतात. या पृथ्वीतलावर माणूस हा तंबाखू सेवन करणारा एकमेव सजीव प्राणी आहे. ( तंबाखू खाणं अपायकारक आहे हे जनावरांना समजतं ते सर्वात विकसित  झालेल्या माणसाच्या मेंदूला समजत नसावं हे  जगातलं आश्चर्य आहे. )  
                                                                    तंबाखूमध्ये सुमारे साडेचार हजार वेगवेगळी रसायनं असतात आणि बहुतांशी सर्व रसायनं शरीराच्या दृष्टीने त्रासदायक असतात. त्यातलं निकोटिन हे द्रव्य सर्वात घातक मानलं जातं. खरं तर ते विषंच! कारण त्याचा उपयोग प्रामुख्याने कीटकनाशक म्हणून केला जातो. तंबाखूच्या गाळातून निकोटिन सल्फेट नावाचं रसायन बनतं आणि ते रसायन अनेक कीटकनाशकांचा मोठा हिस्सा असतं.
                                                                  ही सारी माहिती मला अगदी नवीन होती; पण ही निकोटिनयुक्त तंबाखू शरीरावर कसकसा परिणाम घडवून आणते त्याबद्दल विशेष माहिती नव्हती. तेच समजून घ्यायला मी माधवसरांकडे गेलो. मुक्तांगणने प्रकाशित केलेली पुस्तिका मी चाळली आहे. पण, मला अजून काही प्रश्न आहेत असं सांगितल्यावर ते म्हणाले,‘ तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. व्यसनी माणसे असतात ना त्यांना जास्त माहिती दिली तर त्या माहितीची चिरफाड करतात. आता निकोटिनचा वापर अल्झायमरसाठी  उपचार म्हणून होऊ शकतो असे काही त्यांना कळले तर मला अल्झायमर होऊ नये म्हणून मी तंबाखू खात राहीन असं तिरपं डोकं ते चालवू शकतात. म्हणून काही गोष्टी आम्ही आपणाहूनच सांगण्याचे टाळतो.’’ ‘‘ पण मला सांगाल न?’’ मी हसत विचारले. प्रश्नच नाही माझी निकोटिन विषयावर पीएचडी झाली आहे. फक्त अधिकृत पदवी मिळायची बाकी आहे आणि माझ्या पीएचडीला स्वत: वीस वर्षे निकोटिन वापरण्याचा जबरा अनुभव आहे.’’ डोळे मिचकावत त्यांनी एक स्माइल दिलं. ‘‘ त्याचं काय होतं निकोटिन लगेच रक्तात मिसळतं. आणि अँड्रेनल ग्रंथींना उत्तेजित करतं. त्यामुळे एपिनेफ्रीन या हार्मोन्सचं स्त्रवण करतं. एपिनेफ्रीन मध्यवर्ती मज्जासंस्थेला उत्तेजित करतं आणि त्यामुळे रक्तदाब वाढतो. श्वासावर परिणाम होतो आणि हृदयाची धडधड वाढते.’’ ‘‘त्यातून निकोटिनची जी सवय होते, ती सुटता सुटत नाही. आणि म्हणून अनेकजण समजूनही या व्यसनातून बाहेर पडत नाही. पण, हे सारंच जीवघेणं आणि वेळीच बाहेर पडलं नाही, तर आयुष्याचा घात होणारच!’’ ते बोलत होते आणि मला माझ्या अवती-भोवती गुटखा-तंबाखू-मावा खाणारे तरुण चेहरे आठवत होते….! 
                                           मी वाचलेली ही तंबाखूची गोष्ट लोकमत ई-पेपर मधील oxigen पुरवणीतील आहे. वर्तमान स्थितीत या विषयावर चाललेली चर्चा पहाता प्रत्येक तरुण व्यक्तीपर्यंत जाण्याचा हा छोटासा प्रयत्न....
सहकार्य-आनंद पटवर्धन  ( मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र, पुणे व ऑक्सीजन टीम लोकमत )

No comments:

Post a Comment