• सुप्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ डॉ. हरीश शेट्टी यांनी what’s app ( other social media ) वापरणाऱ्या
मुलांच्या मानसिकतेबद्दल केलेले विश्लेषण लोकमतच्या Oxigen पुरवणीत वाचण्यात आले.
हा लेख निश्चितच सर्व तरुणांसाठी महत्वाचा आहे. ज्यांनी हा लेख वाचला नसेल त्यांच्यासाठी
पुन्हा हा छोटासा प्रयत्न...
‘व्हॉट्सअँप’वर आपला फार
वेळ जातो आहे; त्यामुळे आपलं डिस्ट्रॅक्शन होतं आहे. आपला
फोकस त्यामुळेच हलला आहे असं जर तुम्हाला वाटत असेल, तर ही समजूत पहिले
मनातून काढून टाका! व्हॉट्सअँप सतत पाहून पाहून, तिथं बोलून बोलून तुमचा फोकस
हललेला नाही हे पहिले लक्षात घ्या. उलट तुम्ही सतत व्हॉट्सअँपवर जाताय, तिथं बोलताय, कोण काय
म्हणतंय ते वाचताय, इतरांचं लक्ष आपल्याकडे वेधलं जाईल अशा पोस्ट करताय, याचा अर्थ मुळातच तुमचा ‘फोकस’ हललेला आहे.
मुळातच तुम्ही डिस्ट्रॅक्ट आहात. तुमचं अभ्यासात लक्ष नाही, मन रमत नाही, तुमच्या
मनाला काहीतरी टोचतंय, कुणाला ते सांगता येत नाही. म्हणून मग
गप्प बसण्यापेक्षा तुम्ही स्वत:चा ताण कमी करण्यासाठी सतत व्हॉट्सअँपवर
जाता, तिथं काहीबाही बोलता, चर्चा करता, सतत बोलता आणि स्वत:वरचा ताण कमी करण्याचा प्रयत्न करता!
त्यामुळे तुम्ही जर खूप जास्त व्हॉट्सअँप परीक्षा काळातही
वापरत असाल, तुम्हाला त्याशिवाय करमतच नसेल तर त्याचं खापर त्या साधनावर
फोडू नका.
आपलं काय बिनसलंय, आपलं मन कशानं नाराज आहे, अभ्यासात
आपल्याला काय जमत नाहीये म्हणून आपण ही पळवाट शोधतोय याचा जरा विचार करा.
या प्रश्नांची उत्तरं सापडली, तुमचं मन अभ्यासात गुंतलं, तुमची प्रायॉरिटी काय हे तुमच्या लक्षात आलं तर तुमचं मन
व्हॉट्सअँपकडे फार धाव घेणार नाही. फारतर विरंगुळा म्हणून तुम्ही त्याकडे पाहाल.
बोलाल, शेअर कराल, रिलॅक्स
व्हाल!
त्यामुळे तुमच्या मनातला प्रश्नच चुकीचा आहे हे समजून घ्या, म्हणजे मग
बरोबर उत्तर सापडेल!!
आणखी एक गोष्ट लक्षात घ्या, शेवटच्या क्षणी कुणाचाही अभ्यास
होत नसतो. तुम्ही वर्षभर काहीही केलं नसेल आणि आता लास्ट मिनिट रट्टा
मारू म्हणत असाल तर त्याचा काही उपयोग नाही. आणि तो उपयोग होत नसेल तर
तुम्ही त्याचं खापर आपल्या हातातल्या मोबाइलवरही फोडून काही उपयोग नाही.
ती दुसरी एक पळवाट ठरेल.
त्यामुळे तुम्ही आधीपासून अभ्यास केलेला असेल आणि आता तुमचा
मानसिक ताण खूप वाढत असेल, आपण ब्लॉक होतोय, मेंदू शिणला
आहे असं वाटत असेल तर खरंच रिलॅक्स करा!
आणि ते रिलॅक्सेशन तुम्हाला व्हॉट्सअँप वापरून मिळणार असेल, जरा हलकं-हायसं वाटणार असेल, मित्रांशी बोलून, आपला
प्रॉब्लेम त्यांच्याशी शेअर करून जरा रिलीफ मिळणार असेल तर
बिंधास्त थोडावेळ व्हॉट्सअँप वापरा.
त्यानं तुमचं नुकसान होणार नाही, झाली तर मदतच
होईल!
कारण नुस्तं अभ्यास एके अभ्यास करत राहिलं, सतत
डोळ्यासमोर पुस्तक धरलं तरी वाचलेलं तुमच्या मेंदूत सेव्ह होईलच असं काही
नाही. उलट अनेकदा कम्प्युटरसारखंच होतं. आपण जे काम करतो, त्याच्या
फाईल्स तयार होतात. पण त्या दिसत नाहीत, सापडत नाहीत. त्याला हिडन
फाईल्स म्हणतात. त्या तयार होतात पण त्यांचा उपयोग काही
होत नाही. तसंच आपल्या मेंदूतही हिडन फाईल्स तयार होतात.
मेमरीत काही उतरत नाही. उपयोग शून्य.
हे असं कशानं होतं तर तुम्हाला एन्झायटी मॅनेजमेण्ट जमत
नाही. मनावरचा ताण हलका करता येत नाही. शीण कमी होत नाही.
हा शीण उतरला नाही तर जे येतं तेही येणार नाही. आणि तो शीण
उतरवण्याचा ज्याचा त्याचा मार्ग असतो.
आता जर मित्रांशी व्हॉट्सअँपवर बोलणं हा शीण कमी करण्याचा
मार्ग आहे असं तुम्हाला वाटत असेल, तर रिलॅक्स करा, अर्धा तास भरपूर गप्पा मारा, हसा, चेष्टा करा, जोक एन्जॉय
करा.
ैआणि पुन्हा अभ्यासाला लागा. तुम्ही रीफ्रेश व्हाल.
पण मुळातच अभ्यास काही नसेल, त्याचंच टेन्शन असेल, डोक्यात
काहीच शिरलेलं नसेल, तर व्हॉट्सअँप वापरल्यानं माझं
नुकसान झालं असं म्हणण्यात काहीच हाशील नाही!!
परीक्षेच्या काळात एवढं करता येईल?
१) वर्षभर अभ्यास केलेला असेल किंवा तुम्ही आत्ताही उत्तम
अभ्यास करत असाल तर रिलॅक्स व्हायला अर्धापाऊण तास व्हॉट्सअँप वापरायला
काहीच हरकत नाही.
२) अनेक शिक्षक व्हॉट्सअँपवर अँव्हेलेबल असतात; त्यामुळं
काही अडलं तर त्यांना विचारा, पुन्हा आपल्याला समजलंय की नाही
याची खात्री करून घ्या.
३) मित्रांशी बोलून तुम्हाला चांगलं वाटतं ना; जरा रिलीफ
मिळतो; मग बोला. पूर्वी मित्रांना
भेटल्यावर बरं वाटतं, आता व्हॉट्सअँपवर भेटता येतं, एवढंच! त्या भेटीनं मेंदूचा शीण
उतरणार असेल तर काय हवं!
४) तुमचा ओढा व्हॉट्सअँपकडे अतीच असेल; त्याशिवाय
काहीच सुचत नसेल तर तुमचं मन ताळ्यावर नाही असं समजा. कुणाशी तरी बोला, पालकांशी
बोला, मदत घ्या. गप्प राहू नका.
५) व्हॉट्सअँप हा आपल्या प्रेशर कुकरचा वॉल्व आहे असं समजा, तो उडू देऊ
नका. तेवढय़ापुरताच वापरा!!
- डॉ. हरीश शेट्टी
सुप्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ
(शब्दांकन- ऑक्सिजन टीम)
ही सर्व माहिती आणि मार्गदर्शन आम्हा तरुणांना दिल्याबद्दल डॉ. हरीश आणि ऑक्सिजन टीमचे हार्दिक आभार...!