"तुम्ही सकाळी किती वाजता उठता?"
झोपायला कितीही उशीर झाला तरी, तरी रोज मी पाच वाजता उठतो!
मोठी माणसं सांगायची,
“लवकर निजे, लवकर उठे, त्यास आयु-आरोग्य लाभे !”
आणि ते खरं आहे,
हेल एरॉल्ड नावाचं एक जगप्रसिद्ध व्यक्तिमत्व आहे, ते एक प्रचंड यशस्वी व्यावसायिक होते, मोठ्या जिद्दीने त्यांनी एका अपघातामुळे आलेल्या शारीरिक विकलांगतेवर मात केली होती.
पण २००८ च्या महामंदीत त्यांचा प्रचंड लॉस झाला, अब्जोपती हेल कर्जबाजारी झाला.
पण तो हार मानणारा नव्हता, यातुन बाहेर कसं पडावं, हे विचारण्यासाठी तो आपल्या एका यशस्वी मित्राकडे गेला, मित्राने त्याला काय सल्ला दिला असेल बरं?
*"हेल, तू सकाळी लवकर उठ!बाकी सगळं आपोआप होईल”*
या चमत्कारिक सल्ल्याने हेल निराश झाला, त्याला काहीतरी आगळेवेगळे उपाय अपेक्षित होते.
काही दिवस त्याने कसेबसे ढकलले, पण दिवसेंदिवस निराशा त्याला घेरत होती, मग नाईलाज म्हणून त्याने सकाळी चार वाजता उठायची सुरुवात केली.
...आणि हेल सांगतो, त्याचं आयुष्यच बदलुन गेलं!
पहाट आणि सूर्योदय इतके जादुई असतात का?
इतक्या सकाळी उठून काय करावं? ह्या प्रश्नावर हेलने एक कोडवर्ड सांगितलाय.
*‘SAVERS’*
ह्या आयुष्य बदलून टाकणार्या सहा सवयी आहेत.
१) *Silence – (ध्यान)*
- शांत बसुन स्वतःच्या आत डोकावणे, म्हणजे ध्यान!
- स्वतःच्या आतल्या चेतनेला स्पर्श करणे, म्हणजे ध्यान!
- मनाच्या कॉम्पुटरला फॉर्मेट करुन व्हायरस रिमुव्ह करणे म्हणजे ध्यान!
- मन प्रफुल्लीत आणि ताजतवानं करण्यासाठी आवश्यक असते ध्यान!
- माणसाच्या गरजा किती कमी आहेत, आणि सगळ्या चिंता किती व्यर्थ आहेत याची आत्मप्रचिती म्हणजे ध्यान!
- अफाट, अदभुत आणि आनंददायी विश्वशक्तीसोबत स्वतःला जोडून घेणे, आणि स्वतःच्या मन-शरीराचा कणकण प्रफुल्लित करवुन घेण्याची कृती म्हणजे ध्यान!
२) *Affirmations – (सकारात्मक स्वयंसूचना)*
- अफरमेशन्स म्हणजे स्वसंवाद!
- स्वतः स्वतःला सूचना देणं,
- प्रचंड शक्तिशाली असलेल्या अंतर्मनावर आपण निश्चित केलेलं ध्येय कोरणं!
- येत्या पाच वर्षात, येत्या एक वर्षात, पुढच्या एका महिन्यात, पुढच्या एका आठवड्यात, आणि आज दिवस भर मी काय काय करणार आहे, याचं मनातल्या मनात पुन्हा पुन्हा रिव्हीजन करणे म्हणजे स्वयंसूचना!
- स्वयंसूचनांमुळे कल्पना खोल अंतर्मनात झिरपतात, आणि नाटकीयरित्या सत्यातही उतरतात.
- अंतर्मनाची शक्ती प्रचंड असल्यामुळे तिथे रुजलेला प्रत्येक विचार मग तो चांगला असो की वाईट, खराच होतो.
- आपले पूर्वज म्हणायचे, "शुभ बोल नाऱ्या!..किंवा जिभेवर सरस्वती असते, आपण बोलु तसेच घडते, जिभेवरचे देवता तथास्तु म्हणते, वगैरे वगैरे"
- या सगळ्या अंधश्रद्धा नव्हत्या, ह्यामागे मनोविज्ञान आहे.
- एखादी गोष्ट हजारो वेळा बोलली तर ती अंतर्मनात प्रक्षेपित होते, मग अशुभ कशाला बोलायचे?
- वाईट बोलून विनाशाला आमंत्रण देण्यापेक्षा, ‘या सुखांनो या’!...
३) *Visualize – (चांगल्या कल्पना मनात घोळवणे.)*
तीव्र इच्छा पूर्ण झाली आहे, अशी मनातून कल्पना करणं, ती पूर्ण झाल्याचा आनंद व्यक्त करणं आणि मनःपटलावर तिला बारीक सारीक रुपात साकारणं, म्हणजे व्हिजुवलायजेशन!
- कल्पनाशक्ती ही भगवंताने माणसाला दिलेली सर्वात अनमोल आणि सर्वात प्रभावशाली भेट आहे.
- कल्पनाशक्तीचा योग्य वापर केल्यास साधारण माणसाचं यशस्वी व्यक्तीमध्ये रुपांतर होतं.
- दररोज आपण आपली ध्येयं पूर्ण झाली आहेत, असं मनात घोळवलं पाहीजे.
- पोहण्याच्या स्पर्धेत सुवर्णपदकांची रास उभी करणारा मायकेल फेल्प्स म्हणतो. "ज्यावेळी मला झोप येऊ लागते, तेव्हा मला जे नक्की करायचे आहे, ते मनातल्या मनात बघण्याचा मी प्रयत्न करतो."
- ऑलंपिकविजेती एथलिट लेन बीचले म्हणाली होती, "मागचे चार वर्ष मी एकच निकाल डोळ्यापुढे आणत होते, ते म्हणजे, मी हातात विजेतापदक घेऊन उभी आहे, आणि माझ्यावर शॅंपेनचा वर्षाव होत आहे."
- मायकेस स्मिथ म्हणाला," मी मला हवे असलेल्या स्वप्नाचे रेखाचित्र कागदावर रेखाटतो, स्वप्नांबद्द्ल टिपण लिहितो आणि वेगवेगळ्या पद्धतीने त्याला डोळ्यांसमोर उभे करतो.
- प्रसिद्ध उद्योगपती अझीम प्रेमजींना त्यांच्या यशाचे रहस्य विचारले तर ते म्हणाले, “यश दोनदा मिळते, एकदा मनात आणि दुसऱ्यांदा वास्तव जगात!”
४) *Exercise – (व्यायाम)*
- शरीरातून आळसाला पळवून लावण्यासाठी, शरीरातील ऊर्जा वाहती ठेवण्यासाठी, मनाने कणखर आणि आनंदी राहण्यासाठी आवश्यक असतो, व्यायाम!
- शरीर आळसावलं की मन भ्रष्ट झालंच समजा!
- व्यायाम, योगासने, प्राणायाम यांच्या माध्यमातून ऊर्जेला वळण न दिल्यास ती अतिरिक्त मैथुनाकडे वळते, आणि माणुस वासनांचा गुलाम बनतो.
- वाईट सवयींचा गुलाम झालेल्या माणसातले चैतन्य हरपते, अशा व्यक्तीला एकाकी असल्याची जाणीव अस्वस्थ करते.
- तो कशावरच एकाग्र होऊ शकत नाही आणि म्हणुन तो आनंदी होऊ शकत नाही, मनात एक अनामिक भय तयार होते.
- ह्या सगळ्या दुष्ट शृंखलेला तोडण्याचा एकच उपाय, तो म्हणजे, व्यायाम करा, डिप्स मारा, सूर्यनमस्कार घाला, पुलअप्स करा, ट्रेडमिलवर घाम गाळा,
- शरीरातले चैतन्य जिवंत ठेवा.
५) *Reading – (वाचन)*
- पुस्तकं वाचणारी माणसं एका आयुष्यात अनेक आयुष्य जगतात.
- "पुढच्याच ठेस, मागचा शहाणा" ह्या न्यायाने दुसर्यांच्या अनुभवाने शहाणे होणारे लोक जगावर राज्य करतात.
- वॉरेन बफे, बिल गेटस, मार्क जुकरबर्ग हे सगळे आठवड्याला दोन पुस्तके वाचून पूर्ण करतात.
६) *Scribing – (लिहिणे.)*
- माझे ठाम मत आहे, की माझ्या आयुष्यातल्या खडतर काळात मी जर लिहित राहीलो नसतो तर मी आज जिवंत राहीलो नसतो.
- लिहिल्याने तुमची तुमच्याशी नव्याने भेट होते.
- लिहिल्याने मन रिकामे होते, दुःख नाहीसे होते, मनात नव्या ऊर्जेचा संचार होतो.
- लिहिल्याने नवे रस्ते उघडतात, नव्या प्रगतीच्या वाटा खुलतात.
- म्हणुन संतानी सांगून ठेवले आहे,
"दिसामाजी काहीतरी लिहीत जावे."
- लिहिणं हे सुद्धा स्वसंवादाचं प्रभावी साधन आहे.
- लिहिल्याने विचार पक्के होतात.
- सकाळी उठल्यावर आज दिवस भर मी काय करणार आहे, ते लिहावं,
- एखादी समस्या छळत असेल तर ती लिहून त्याचे उपाय लिहावेत,
- मनाला स्वप्नांच्या आकाशात मुक्तपणे पाठवून कागदावर स्वप्ने रेखाटावीत.
- ती स्वप्ने पूर्ण करण्यासाठी मी काय काय करणार आहे, त्याचं प्लानिंग, नियोजनही लिहावं,
- आणि रोज स्वतःला कामे नेमुन द्यावीत, आणि पूर्ण झाली की स्वतःला विजयी घोषित करावं.
- लिहिल्यानं मन मोकळं होतं, चिंतांचं ओझं हलकं हलकं होतं!
- जवळच्या व्यक्तीला पत्रं लिहावीत, कधी प्रेरणादायक किस्से कहाण्या लिहाव्यात.
- अशाने अंतरंग फुलुन येतात, उर्जेचा स्रोत खळखळत वाहतो.
ह्या सहा सवयींपैकी प्रत्येक सवय आयुष्य बदलवून टाकणारी आहे.
वरील सहा सवयींपैकी किती सवयी तुम्ही स्वतःला लावुन घेतल्या आहेत.?
मला ह्या सगळ्या सवयींचा खूप खूप फायदा झाला .
तुम्हालाही ह्या सवयी उपयुक्त ठरतील.
सुदैवाने म्हणा अथवा दुर्दैवाने म्हणा पण आता आपल्यापैकी प्रत्येकाकडे भरपूर रिकामा वेळ आहे...तो वेळ नकारात्मक पोस्ट वाचून त्यावर चिंतन करण्यात वाया घालवावा की वरीलपैकी कोणत्याही एका किंवा जमत असल्यास सर्वच गोष्टी अंमलात आणण्यासाठी प्रयत्न करायचा हे सर्वस्वी आपणच ठरवायचे आहे...कोणतीही गोष्ट अंगवळणी पाडण्यासाठी किमान 21 दिवसांचा सराव आवश्यक असतो...आणि आपल्याकडे आता कदाचित 21 पेक्षा जास्त दिवस रिकामे असणार आहेत..तेव्हा या वेळेचा सदुपयोग करून भावी जीवनासाठी सशक्त मन आणि सशक्त शरीर बनवू....
अशी वेळ व संधी पुन्हा येणार नाही व ती येऊ ही नये.....
वेळ आहे स्वतःवर काम करण्याची....स्वतःसाठी जगण्याची.....आलेल्या परिस्थितीचा फायदा करून घेण्याची.....
उगीचच मनात भीती उत्पन्न करणारे मेसेजेस फॉरवर्ड करण्यात आणि वाचण्यात वेळ वाया घालवू नका....
*काळजी घ्यायची आहे,काळजी करायची नाही.* ( संकलन )
No comments:
Post a Comment