महाराष्ट्र
अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या पूर्व विदर्भातील जिल्हा भेटींचा कार्यक्रम संपवून
परतीच्या प्रवासात गोंदिया
ते नागपूर दरम्यान रेल्वेत सहा महाविद्यालयीन तरुणी भेटल्या. चेहरे आणि पेहराव
यावरून सर्वच जणी सुखवस्तू घरातल्या दिसत होत्या. आजूबाजूच्या लोकांकडे पूर्ण
दुर्लक्ष करत तरुणाई आणि मैत्रीत रमेलेल्या. चांगल्या अर्थाने बिनधास्त. चार
जणींच्या सीटवर पाच मैत्रीणी बसून सहाव्याला स्पष्ट नकार देणाऱ्या. मोठ्या प्रवाशी
बॅग घेऊन कुठेतरी दुरच्या प्रवासाला. पालकांनी शिक्षकांचे नंबर मागितल्यावर
प्राध्यापक म्हणून मित्राचे नंबर बिनधास्त पणे देणाऱ्या. केस विस्कटू नयेत म्हणून
गरमी सहन करतही खिडकी बंद ठेवणार्या.
थोडा
वेळ गेल्यावर मी स्वतःहून त्यांच्या मनमौजी चर्चेत हस्तक्षेप करत बोलायला सुरवात
केली. (त्या हिंदीत बोलत होत्या म्हणून मी सुरवात हिंदीत केली आणि पुढे त्यांना
मराठी समजतंय म्हंटल्यावर पुढे मराठीतच बोलू लागलो. इथे सर्व संवाद मराठीतच आणि
माझ्या भाषेत लिहीत आहे.)
मी: Hi, काय शिकता तुम्ही ?
एक:
एम. बी. बी. एस.
मी: कोणत्या वर्गात आहात ?
एक:
दुसऱ्या...
मी:
आता कुठे चाललाय?
दोन:
कॉलेजच्या 'इव्हेंट'
साठी टीमसोबत दिल्लीला चाललोय आणि तिथून पंधरा दिवस उत्तर भारत सफर
करणार.
मी: मी
तुमच्याशी बोलू शकतो ना?
सर्वजणी:
हो बोला ना अंकल. (हल्ली महाविद्यालयीन युवा मला 'अंकल किंवा काका'च
म्हणतात. मीही ते स्वीकारलंय!)
मी:
आम्ही महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते आहोत. तुम्ही या
संघटनेचं नाव याआधी ऐकलंय?
सर्वांच्या
चेहर्यावर प्रश्नचिन्ह ....
मी: डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचं
नाव ऐकलंय?
दोन:
हो, ते superstition निरोध काहीतरी करत होते ना?
मी: हो, तेच
...
तीन:
आणि त्यांचा murder झाला
...
मी:
बरोबर. आता तुम्ही जशा गप्पा मारताय तशा कधी दाभोलकर किंवा अंधश्रद्धा या विषयी
बोललाय?
सर्वजणी: नाही.
मी:
ठीक आहे. तुमच्या गप्पांत अडथळा ठरणार नसतील तर आता या विषयावर आपण काही बोलूया.
काहीजणी:
हो ...
मी: आज
एकविसाव्या शतकातही आपल्या समाजात अंधश्रद्धा आहेत का?
चार:
हो, आहेत ना!
मी:
मग अंधश्रद्धा असणं चांगली गोष्ट आहे की वाईट?
सर्वजणी:
वाईटच !
मी: मग
दाभोलकर चांगले काम करत होते की वाईट?
सर्वजणी:
अर्थातच चांगलं.
मी: मग त्यांचा खून झाला हे
चांगलं झालं की वाईट?
सर्वजणी: वाईट!
मी:
महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समिती देवाला विरोध करते असं तुम्हाला वाटतंय का?
पाच:
नाही, कारण
देव आणि अंधश्रद्धा या वेगळ्या गोष्टी आहेत. (सुरवातीला सांगितल्याप्रमाणे त्यांना
अंनिस विषयी काहीही माहिती नव्हतं.)
मी:
बरोबर. आणि आपल्या संविधानाने देशाच्या प्रत्येक नागरिकाला धर्म आणि
उपासनेचं स्वातंत्र्य दिलं आहे. त्यामुळे तुम्ही चुकीच्या परंपरांची चिकित्सा करू
शकता पण उपासनेवर बंदी नाही घालू शकत.
सर्वजणी:....
मी:
तुम्ही 'युग
मेश्राम' हे नाव ऐकलंय?
सहा: नाही ...
मी:
तुमच्या जवळच्याच चंद्रपूर जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी त्याचा नरबळी देण्यात आला!
एक:
नरबळी? Means?
मी:
नरबळी म्हणजे गुप्तधन किंवा काही तांत्रिक शक्ती प्राप्त करण्यासाठी किंवा एखाद
संकट दूर करण्यासाठी देवाला दिलेला मानवाचा बळी!
दोन:
काय? मानवाचा बळी?
मी: हो
मानवाचा बळी! (मनात म्हंटले आणि मानवतेचाही!)
तीन: पण असं आता कुठे घडतंय?
मी: हो, हे आजही घडतंय. अगदी मुंबई
पासून नागपूर पर्यंत आणि नंदूरबार पासून नांदेडपर्यंत कुठेही घडू शकतं!
सर्वजणी: Oh! we don't believe it!
मी: तरीही हे वास्तव आहे. मी
मघाशी म्हंटलेल्या युग चा गुप्तधन मिळवण्यासाठी नरबळी देण्यात आला. आणि तुम्ही
ज्या यवतमाळ मध्ये एम बी बी एस शिकताय त्याच जिल्ह्यात पाच वर्षांपूर्वी सपना
नावाच्या एका सहा वर्षाच्या मुलीचा नरबळी दिला होता.
सहा: It's really shocking!
मी:
एका महिलेच्या अंगात आलेल्या देवीच्या सांगण्यावरून गावावरचं संकट दूर करण्यासाठी
सपनाचा मामा, आजोबा
यांच्या उपस्थितीत तिचा नरबळी दिला होता. एवढंच नाही तर देवीलातिच्या रक्ताचा
नैवेद्यही दाखवला होता. आणि अमानुषतेची हद्द म्हणजे सपनाचे रक्त प्रसाद म्हणून
तिथल्या उपस्थितांनी प्राशन केले होते.
पाच: It's horrible! कुणी असं कसं करू
शकतं?
मी: हे
भयानक आहे हे खरं आहे. तरीही हे आपल्या समाजात घडतं आहे.
सर्वजणी:
.....
मी:
आता तुमच्याशी संबंधित आणखी एक उदाहरण पाहूया!
शनि
शिंगणापूर माहिती आहे?
एक:
नाही.
मी: महाराष्ट्रात दोन तीन
वर्षांपूर्वी महाराष्ट्रात महिलांना मंदीरात प्रवेश मिळवून देण्यासाठी आंदोलन झालं
होतं. आठवतंय?
मी: हो, कुठेतरी मंदिरात महिलांना
प्रवेश मिळत नाही म्हणून कोण तर lady आंदोलन करत होती. News
पाहिलीय मी!
मी:
शनि शिंगणापूरच्या शनि मंदिरातील चौथऱ्यावर महिलांना प्रवेश दिला जात नव्हता! का
ते माहिती आहे?
सहा:
नाही.
मी: कारण स्त्रियांना अपवित्र
मानलं जातं.
सर्वजणी:
....
मी:
स्त्री का अपवित्र मानली जाते माहिती आहे?
तीन:
का?
मी:
तिला मासिक पाळी येते म्हणून. मासिक पाळी मुळं स्त्रीला अपवित्र मानणं योग्य आहे
का?
दोन: अजिबात नाही!
मी:
बरोबर आहे. मासिक पाळी किंवा कोणत्याही कारणावरून स्त्रीला अपवित्र समजता कामा
नये. तुम्ही मासिक पाळीच्या काळात घरातील देवघरात जाता का?
(यावर
सर्वजणी एकमेकीकडे पाहत नकारात्मक माना हलवू लागल्या. आपण शब्दांत सापडलो याची
जाणीव होऊन दोघी तिघींनी हलकेच जीभ चावली.)
मी:
मासिक पाळीच्या काळात तुम्ही देवघरात का जात नाही?
सर्वजणी:
....
मी:
तुम्ही त्या काळात स्वतःला अपवित्र समजता?
सर्वजणी:
.....
मी:
असं तुम्हाला वाटत नसलं तरीही ते असंच आहे.
(यावर
त्या खोटं खोटं हसल्यासारखं करू लागल्या.)
मी:
तुम्ही वैद्यकीय शाखेच्या विद्यार्थिनी आहात. उद्या कधीतरी डॉक्टर होणार आहात.
तरीही मासिक पाळीविषयी किंवा त्यामुळे स्त्रीला दिल्या जाणाऱ्या दुय्यमत्वाविषयी
कधी विचारच केला नाही. हे गंभीर नाही का?
सर्वजणी:
.....
मी:
मला सांगा उद्या तुम्ही डॉक्टर म्हणून काम करू लागल्यावर एखादी पालक त्यांच्या
सतरा, अठरा
वर्षांच्या मुलीला मासिक पाळी येत नाही म्हणून तुमच्याकडे घेऊन आल्या तर तुम्ही
काय सांगाल? पाळी येत नाही ही चांगली गोष्ट आहे म्हणाल की
काहीतरी दोष आहे म्हणाल?
सर्वजणी:
...
पाच:
काहीतरी problem आहे
आपण तपासण्या करुया म्हणून सांगू.
मी:
आणि समजा कोणत्याच स्त्रीला पाळी आली नाही तर काय होईल?
(आता हा
प्रश्नच त्यांना अनपेक्षित होता. यावर काय उत्तर द्यावं हेच समजेना.)
मी:
स्त्रीला मासिक पाळी आली नाही तर ती बाळाला जन्मच देऊ शकणार नाही ना?
तीन: हो, बरोबर.
मी: मग मानव वंश पुढे चालेल का?
चार: कसं शक्य आहे?
मी:
म्हणजे मासिक पाळीवरून पवित्र अपवित्रता ठरवायची झाली तर स्त्री अपवित्र ठरेल की
पवित्र?
(आता
त्यांचा चेहरा खुलला. )
सर्वजणी:
अर्थात पवित्रत ठरेल!
मी: म्हणजे मासिक पाळीपण
पवित्रच. बरोबर.
सर्वजणी: होय.
मी: मग
दिल्लीहून आल्यावर मासिक पाळीच्या काळात तुम्ही देवघरात जाल?
(ही
त्यांच्यासाठी आणखी एक गुगली होती. त्यावर पुन्हा एकदा त्या संभ्रमात दिसल्या)
मी:
यावर आताच उत्तर देऊ नका पण विचार तर कराल की नाही?
सहा: हो, नक्की
विचार करू.
मी:
आता आणखी एक उदाहरण घेऊ.
तुम्हाला
ऐश्वर्या रॉय माहिती आहे?
एक: म्हणजे काय?
मी:
तिचे पहिले लग्न कुणाबरोबर झालंय?
दोन:
विवेक ओबेरॉय?
मी: नाही ...
तीन:
अगं तिचं एकच लग्न झालंय! अभिषेक बच्चन बरोबर.
मी:
नाही अभिषेकरावांपूर्वी तिचं आणखी एक लग्न झालंय. अगदी अमिताभ आजोबा, जया आजीबाई आणि अभिषेकरावांच्या
संमतीने!
(सर्वजणी
थक्क! )
मी:
ऐश्वर्याताईचं पहिलं लग्न एका झाडाबरोबर झालंय?
सर्वजणी: ऑ?
मी:
होय तिला मंगळ होता म्हणून लग्नानंतर काही दिवसांतच तिच्या पहिल्या पतीचं निधन
होणार होतं. यावर उपाय म्हणून ज्योतिषाचार्यांनी तिला पिंपळाच्या झाडाबरोबर पहिलं
लग्न करण्याचा सल्ला दिला. बच्चन आणि रॉय परिवाराने तो तंतोतंत अंमलात आणला.
आपल्या मिडियाने तो देशाला दाखवला देखील.
या
पहिल्या लग्नानंतर घटस्फोट न देताच ऐश्वर्याताईंनी अभिषेकरावांशी दुसरे लग्न केले.
खरं म्हणजे हा गुन्हा आहे.
(यावर
त्या हसू लागल्या)
आणि
त्या झाडाचं पुढं काय झालं हे मात्र मिडियाने दाखवलं नाही. (मुलींचा हसण्याचा आवाज
आणखी वाढला.
मी: मी
कशा विषयी बोलतोय हे तुम्हाला कळलं असेल.
पाच: हो, astrology विषयी.
सहा:
पण astrology हे तर science आहे म्हणतात ना? त्याचा superstition शी काय संबंध?
मी: या
astrology चा base काय आहे तुम्हाला माहिती आहे?
तीन: जन्म पत्रिका ?
मी:
बरोबर. यात काय लिहिलेलं असतं माहिती आहे?
तीन: नाही.
मी:
त्यामध्ये काही तिरक्या रेघा मारलेल्या असतात. त्यामुळे बनलेल्या चौकोनात काही अंक
आणि अक्षरे लिहिलेली असतात.
यापैकी
अक्षरे म्हणजे आपल्या ग्रहमालेतील ग्रहांच्या नावांची आद्याक्षरे असतात.
जसे -
र म्हणजे रवी, म्हणजे
सूर्य.
एक: पण
तो तर तारा आहे...
मी:
बरोबर. चं म्हणजे चंद्र.
पाच: आणि
satellite आहे.
मी:
आपण मराठीत त्याला उपग्रह म्हणतो. रा म्हणजे राहू.
चार:
माझ्या माहितीनुसार असा कोणताच ग्रह नाही.
मी:
आणि के म्हणजे केतू.
सहा: असाही कोणता ग्रह नाही.
मी:
आता मला सांगा ज्याच्या गृहितकांपैकी जवळ जवळ अर्ध्या बाबी चुकीच्या आहेत असा
कोणता विषय विज्ञान असू शकेल का?
सर्वजणी:
....
मी:
आपण थोडं पुढे जाऊ.
मला
सांगा आपली जन्म पत्रिका कशाच्या आधारावर बनवली जाते माहिती आहे का?
सहा:
जन्मवेळेच्या ना?
मी: बरोबर. आता भावी डॉक्टर
म्हणून मला सांगा बाळाच्या जन्माची नेमकी वेळ कोणती?
दोन:
म्हणजे?
मी:
म्हणजे स्त्री आणि पुरुषाचे लैंगिक संबंध आल्यावर कधीतरी स्त्री बीज आणि पुरुष बीज
यांचे मिलन होते त्याक्षणी नवा जीव जन्माला येण्याची प्रक्रिया सुरू होते. याला
जन्म वेळ म्हणता येईल की नाही.
दोन: खरंतर म्हणायला पाहिजे.
मी:
अगदी सुक्ष्म असणारे ते भ्रूण पुढे काही दिसण्यायोग्य आकार धारण करतं. यालाही जन्म
म्हणता येईल का?
दोन:
नाही शंका आहे.
मी:
अगदी आई बाळाला जन्म देताना एका क्षणात शरीरातून बाहेर टाकते का?
तीन:
नाही त्या बराच वेळ लागतो.
मी: मग
बाळाचा एखादा अवयव शरीरातून बाहेर येतो त्याला जन्मवेळ म्हणायची की पूर्ण बाळ
बाहेर आल्यावर? की
बाळाची नाळ कापून बाळाला संपूर्ण वेगळं केल्यावर?
चार:
नाळ कापली जाते ती वेळ.
मी: पण
प्रत्यक्षात जीव म्हणून ते काही महिने आधीच जन्माला आलंय.
इतर:
होय, हेही बरोबर आहे.
मी:
म्हणजे बाळाच्या जन्माची नेमकी वेळ ठरवणे कठीण आहे.
सर्वजणी:
होय, बरोबर आहे तुमचं.
मी:
आणि ऑपरेट करून नैसर्गिक जन्मवेळ टाळून डॉक्टरच ती ठरवतात.
(सर्वजणी
हसू लागतात.)
मी:
आता अजून पुढे जाऊ.
मला
सांगा, एखाद्या
रुग्णालयात अगदी एकाच ऑपरेशन टेबल एखाद्या उद्योगपतीची मुलगी, एखादी झोपडपट्टीतील मुलगी आणि तुमच्या, माझ्यासारख्या
घरातील एखादी मुलगी बाळंतपणासाठी ठेवल्या. अगदी ठरवून ऑपरेट करून एकाच वेळी बाळाला
जन्म दिला तर त्या तिन्ही बाळांचं भविष्य एकच असेल का?
सर्वजणी:
नाही.
मी:
आता सर्वात महत्वाच्या मुद्यावर बोलू.
(सर्वजणी
थोड्या सावरून बसल्या. )
मी:
फलज्योतिषाचं आणि या ज्योतिषाचार्यांचं म्हणणं आहे की अवकाशातील खगोल, आणि त्यांची स्थिती यांचा मानवी
जीवनावर इष्ट अनिष्ट परिणाम होत असतो. बरोबर?
चार: बरोबर.
मी: मला सांगा हे जे ग्रह आहेत
ते सजीव आहेत की निर्जीव?
एक:
निर्जीव.
मी: मग कोणतीही निर्जीव वस्तू
कोणत्याही सजीवावर आपोआप काहीतरी परिणाम करू शकते का? उदा.
खिडकीतून बाहेर दिसतो तो दगड कोणत्याही सजीवावर आपोआप काही परिणाम करील का?
दोन: नाही.
मी: क्षणभर हे ग्रह परिणाम
करतात असे मानले तरी ते फक्त मानवावरच परिणाम करतील की सर्व सजीवांवर करतील.
तीन:
तसं असेल तर त्यांचा परिणाम सर्व सजीवांवर व्हायला पाहिजे.
मी:
आणि फक्त मानवावर होत असेल तर विशिष्ट धर्मातील व्यक्तींवरच होईल की सर्वांवर
होईल!
चार: सर्वांवर व्हायला पाहिजे.
मी: पण
आपल्या समाजात तसं दिसतं का?
पाच: नाही.
मी:
आणि अजूनही समजा ग्रहांचा हा परिणाम विशिष्ट धर्मातील लोकांवरच होत असेल तरीही तो
कमी जास्त करण्यासाठी त्या ग्रहांनी पृथ्वीवर विशेषतः आपल्या देशात काही प्रतिनिधी
नेमलेत का?
(सर्वजणी
हसू लागल्या.)
मी: आतापर्यंत केलेल्या सर्व
चर्चेचा अर्थ एवढाच की फल ज्योतिष हे पूर्णपणे थोतांड आहे.
सर्वजणी
: ...
मी:
अजून एक, कुण्या
मोठ्या संशोधकाने शोधलेला विज्ञानाचा एखादा नियम त्याच्या नंतर दुसऱ्या संशोधकाने
सर्व नियम पाळून खोटा ठरवला तर त्या दुसऱ्या संशोधकाला काय शिक्षा केली जाते?
चार:
शिक्षा कशी केली जाईल. उलट त्याचा गौरव केला जाईल. कदाचित नोबेल पण दिलं जाईल.
मी:
आणि जोतिषी अभिमानाने काय सांगतात? आमचं शास्त्र शेकडो, हजारो
वर्षे जुनं आहे. आणि अपरिवर्तनीय आहे.
आता
तुम्ही डॉक्टर लोक एखाद्या आजारावर पंचवीस तीस वर्षांपूर्वीचे औषध द्याल का?
सर्वजणी:
नाही.
मी: हे
जसं औषधांचं आहे तसंच आपला पेहराव, अन्न, घर, वाहने सर्वांबाबत आहे. मग शेकडो वर्षापासून अजिबात बदल न झालेली गोष्ट
विज्ञान कशी असू शकेल?
मी: मी
असं म्हणत नाही की मी म्हणतो म्हणून तुम्ही मान्य करा. पण जे विज्ञान आणि त्याची
तत्वं वापरून तुम्ही रुग्णांना बरं करणार आहात तीच तत्वं या फल ज्योतिषालाही लावा.
यातून जे सत्य येईल ते मान्य करा.
सर्वजणी:
हो, नक्की. अंकल ...(पुन्हा अंकल.
पण मी हा शब्द स्वीकारलाय. अहो हसू नका खरंच स्वीकारलाय.)
मी:
माफ करा. तुमचा मजेत चाललेला प्रवास मी boring केला का?
चार, पाच: नाही, नाही अंकल. उलट आम्हाला काही नवीन माहिती मिळाली.
मी: मग
आणखी थोडं बोलूया?
सर्वजणी: हो, बोला
ना अंकल.
मी:
तुम्ही विवेकवाहिनी विषयी काही ऐकलंय का?
एक:
नाही. काय आहे हे?
मी:
"विवेकी विचारांच्या आधारे स्वतःचा आणि समाजाचा विधायक आणि कृतीशील विकास करू
इच्छिणार्या तरुण तरुणी प्राध्यापक आणि प्राचार्य यांचे संघटन म्हणजे
विवेकवाहिनी!"
एक:
म्हणजे नेमकं काय समजलं नाही.
मी:
तुम्हाला आपल्या समाजात काही समस्या, दोष, उणीवा, व्यंग दिसतं का?
तीन:
आहेत ना! अनेक आहेत.
मी:
काही उदाहरणे सांगा पाहू.
एक:
मुली आणि स्त्रियांची असुरक्षीतता
दोन:
भ्रष्टाचार
तीन:
कौटुंबिक हिंसाचार
चार: शेतकरी आत्महत्या
पाच: महागाई
सहा:
जातीभेद
मी: मी
बरोबर अशा अनेक समस्या सांगता येतील. त्यात बदल व्हावा असं वाटतं का?
चार: हो, वाटतं
ना!
मी: मग
हा बदल कोण करील?
एक: सरकार.
मी: पण
कोणत्याही सरकार कडून असं काही होताना दिसतंय का?
तीन:
काही प्रमाणात होतंय काही प्रमाणात नाही.
मी:
बरोबर. नागरिक म्हणून, युवा
म्हणून यात काही करू शकतो की नाही?
चार: करू शकतो, पण अभ्यास करीअर यातून वेळ कुठे मिळतो?
मी: मग
या विषयांवर तुम्ही बोलतच नाही का?
पाच: आमच्या friend
circle मध्ये बोलतो ना!
मी: मग
हे friend circle थोडं मोठं केलं,
त्यात एखाद्या समाजाभिमुख प्राध्यापकांना सहभागी करून घेतलं,
अशा महत्वाच्या विषयांवर बोलायचा आठवड्यातील एक वार, वेळ आणि ठिकाण ठरवलं आणि अंमल सुरू केला की झाली विवेकवाहिनी!
सहा: पण केवळ कॉलेज मध्ये बोलून
प्रश्न थोडेच सुटणार आहेत?
मी:
बरोबर आहे. केवळ बोलून प्रश्न सुटणार नाहीत पण विषयाचे गांभीर्य काय आहे हे तरी
लक्षात येईल. त्यातून किमान छोट्या पातळीवर प्रश्न सोडवण्यासाठी काही पर्याय तरी शोधता
येतील. इतरांनी आधीच शोधलेले काही पर्याय समजतील. त्यापैकी काही सोपे मार्ग
सामुहिकपणे कृतीत आणता येतील. प्रश्नांच्या सोडवणूकीसाठी छोटी का होईना पण कृती
केल्याचे समाधान तरी मिळेल.
(हे
ऐकताना सर्वजणींचे काहीसे गंभीर झाले. आपणही हे करू शकतो हा विश्वास चेहर्यावर
दिसू लागला.)
एक:
खरं अंकल. आम्ही कधी असा विचारच केला नव्हता. आम्ही हा प्रयत्न नक्की करू.
मी:
आपण विवेकवाहिनी विषयी बोलतो आहोत आणि तुम्हाला आवडतं आहे तर आणखी काही सांगतो.
सांगू ना?
दोन:
हो सांगा ना ...
मी:
महाराष्ट्र विवेकवाहिनी दोन विचार पायाभूत मानून काम करते.
पहिला
म्हणजे - "आपला विकास आपल्या हाती, हक्क हवेत पण कर्तव्य आधी."
थोडक्यात
सांगायचं तर, तुमचा
माझा विकास करायला कुणी अवतारी पुरुष किंवा स्त्री येणार नाही. आपले काही महत्वाचे
प्रश्न सोडवण्यासाठी आपण शासन आणि प्रशासन ही व्यवस्था निर्माण केली आहे हे खरं पण
ती सक्रिय करण्यासाठी सुध्दा आपल्याला जागरूक आणि कृतीशील रहावं लागतं. माणूस
म्हणून आपल्याला जन्मजात मिळालेले आणि नागरिक म्हणून संविधानाने दिलेले हक्क
आपल्याला हवेच आहेत पण केवळ हक्कांची भाषा न करता आपली कर्तव्यंही आपण पार पाडली
पाहिजेत. आपण आपली कर्तव्यं करत राहिल्यानेही अनेकांना त्यांचे अधिकार मिळत राहणार
आहेत.
आम्ही
करतो त्या कामाविषयीचंच कर्तव्य सांगायचं तर संविधानात कलम 51 A मध्ये सांगितलेल्या
कर्तव्यातील आठवं कर्तव्य आहे - मानवतावाद, शोधक बुद्धी आणि
वैज्ञानिक मनोभावाची यांचा अंगिकार करणे निर्मिती हे नागरिक म्हणून आपले कर्तव्य
आहे.
हे एक
कर्तव्य आपण अंगिकारले तर अंधश्रद्धेतून स्वतःच्या आणि इतरांच्या होणाऱ्या शोषणाला
आपोआप आळा बसणार आहे. आणि शोषणमुक्त आणि सन्मानाने जगण्याचा हक्क मिळणार आहे.
चार:
खरं आहे अंकल.
मी:
आपण स्वतःला एकविसाव्या शतकातील प्रगत मानव म्हणवतो, विज्ञान आणि तंत्रज्ञानाने दिलेली सर्व उपकरणं
वापरतो आणि दुसरीकडे विचार मात्र शेकडो वर्षांपूर्वीचे बाळगतो. डॉ नरेंद्र दाभोलकर
म्हणायचे आपण विज्ञानाची सृष्टी घेतली पण विज्ञानाची दृष्टी घेतली नाही.
विज्ञानाची करणी घेतली पण विचारसरणी घेतली नाही.
हे
संविधानाने सांगितलेल्या एका कर्तव्याविषयी झालं. संविधानात अशी एकूण अकरा
कर्तव्यंसांगितली आहेत. त्याबरोबरच कुटुंब, समाज, महाविद्यालय या सर्व
ठिकाणीही विविध कर्तव्य पार पाडावी लागतात.
(आता
चर्चा भाषणाचं रुप घेत होती. याचा काहीसा ताण मुलींच्या चेहर्यावर दिसत होता.)
मी:
आता खरंच मी थांबायला हवं.
एक:
नाही अंकल, ते
विवेकवाहिनीचं दुसरं तत्वं सांगा ना!
मी:
नको आपण भरपूर गंभीर चर्चा केली. आता तुमच्या गप्पा पुन्हा रंगू द्या नाहीतर
रेल्वेत काय खडूस माणूस भेटला याची चर्चा दिल्लीपर्यंत कराल.
दोन:
नाही खरंच एवढं पूर्ण करा मग थांबू.
(तोपर्यंत
माझ्या शेजारी बसलेल्या सहा नंबरने मान एका बाजूला टाकून डोळे शांत मिटले होते.
समोरची चार नंबर तोंडासमोर हात घेऊन जांभई देत होती. त्या दोघींकडे दुर्लक्ष करत
मी विषय पुढे सुरू केला.
मी: विवेकवाहिनीचे दुसरे तत्व
आहे - "उज्वल भविष्यासाठी आपण सारे बदलूया!"
आता
उज्वल म्हणजे काय तर आपल्या संविधानाच्या सरनाम्यात म्हणजे प्रास्ताविकेत नमूद
केलेला मूल्य आशय असणारा समाज. ही प्रास्ताविका तुम्हाला माहिती आहे का?
तीन:
नाही.
तुम्ही
शाळेत असताना परिपाठाला म्हणायचात ती preamble म्हणजेच प्रास्ताविका.
पाच: OK
मी: असा समाज निर्माण व्हावा
ही संविधान कर्त्यांची आणि आपल्याही इच्छा आहे. त्यासाठी 'आपण
सारे बदलावे.' याचे दोन अर्थ आहेत. पहिला आपण स्वतः बदलावे
आणि दुसरा आपण आपल्या अवतीभवतीचे या मूल्य आशयाला छेद देणारे वास्तव ही बदलावे. या
बदलासाठी स्वतःच्या पातळीवर शक्य असणाऱ्या कृती कराव्यात. आगरकर म्हणायचे
त्याप्रमाणे, "इष्ट ते बोलावे, शक्य
ते करावे."
अशी ही
विवेकवाहिनी केवळ सामाजिकच नाही तर वैयक्तिक व्यक्तीमत्व विकासाचीही संधी देते.
एक: ती
कशी काय अंकल?
मी:
विवेकवाहिनी असं म्हणत नाही की तुम्ही केवळ सामाजिक विषयांवर चर्चा करा. इथे तुमच्या वैयक्तिक
प्रश्नांवरही चर्चा केली जाऊ शकते. हा मंच समवयीन युवांचा असल्यामुळे एकाचा प्रश्न
हा त्या पूर्ण पिढीचा प्रश्नही असू शकतो. त्या अर्थाने स्वतःला पडलेले प्रश्न
मांडणे आणि त्यांची विवेकी उत्तरे शोधण्याची संधी विवेकवाहिनी देते.
दुसरे
म्हणजे आठवड्यातून केवळ एक तासाचा वेळ देऊन विनामूल्य व्यक्तीमत्व विकासाची संधी
विवेकवाहिनी निर्माण करून देते. आज महाराष्ट्रात चालणाऱ्या अनेक विवेकवाहिनीत
प्रवेश केलेले युवा अभिमानाने सांगतात की "मी महाविद्यालयात प्रवेश घेतला
तेव्हा मला नीट बोलताही येत नव्हते. आता मी कितीही मोठ्या समूहासमोर निर्भयपणे
माझे मत मांडू शकतो. ग्रामीण भागातून आणि कमी शिकलेल्या परिवारातून आलेल्या मला
वागण्या बोलण्याची पद्धत तपासण्याची संधी विवेकवाहिनीने मिळवून दिली."
त्याचबरोबर
विवेकवाहिनीच्या सदस्यांमध्ये सुसंवादाचे कौशल्य आणि क्षमताही सुधारते. दुसऱ्याचे
मत ऐकून घेणे, आपले
मत ठामपणे मांडणे, आपल्यापेक्षा वेगळ्या मताचा आदर करून
संयमी पद्धतीने प्रतिवाद करणे, आपले मत चुकीचे आहे हे लक्षात
आले तर दुसऱ्याचे योग्य मत खुलेपणाने स्वीकारने हे विवेकी व्यक्तीमत्व विकासाचे
अविभाज्य घटक सततच्या चर्चेतून अंगी रुजतात.
दोन:
अंकल खरंच हे सगळं भारी आहे. आम्ही कॉलेज जीवनाचा या बाजूने कधी विचारच केला
नव्हता.
मी :
मुलींनो याबरोबरच निर्णय घेण्याचे कौशल्य, ताण तणावांचे समायोजन, आत्मप्रतिष्ठा
अशी जीवन कौशल्ये आणि लिंगभाव समानता, जात, धर्म निरपेक्षता ही मूल्येही विवेकवाहिनी रुजवते जी माणूस म्हणून अधिक
समृद्ध जीवन जगण्यासाठी मदत करतात.
एक: अंकल यासाठी काही वेगळे
उपक्रम घेतले जातात का?
मी: उपक्रमशीलता हे तर आपले
वैशिष्ट्य आहे. काही समान उपक्रम सर्व महाविद्यालयात राबवले जातात तर काहीवेळा
वेगवेगळया महाविद्यालयात वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. त्यामध्ये जवळच्या
शाळांमधील विद्यार्थ्यांकडून फटाकेमुक्त दिवाळीची संकल्पत्रं भरून घेणे, 15
ते 31 डिसेंबर कॉलेजमध्ये व्यसनमुक्ती संकल्प
घेणे, 26 नोव्हेंबर ते 26 जानेवारी
संविधान बांधिलकी महोत्सव राबवणे, 12 जानेवारी ते 14 फेब्रुवारी जोडीदाराची विवेकी निवड अभियान राबवणे असे समान उपक्रम तर काही
ठिकाणी आकाश दर्शन, ग्रहण दर्शन, काही
ठिकाणी पाणी फाऊंडेशन च्या कामात सहभाग, काही ठिकाणी,
युवा मानसमित्र, काही ठिकाणी स्वच्छता
अभियानात सहभाग, काही ठिकाणी समाजातील काही प्रश्नांचे
सर्वेक्षण करून त्यावर उपाययोजना शोधणे असे विविधांगी उपक्रम राबवले जातात.
दोन:
अंकल, आमच्या
कॉलेजमध्ये एन एस एस आहे. मी त्याची सदस्यही आहे. पण तुमची विवेकवाहिनी त्यापेक्षा
खूपच वेगळी आहे.
मी: खरं आहे. अनेक ठिकाणी एन
एस एस आणि विवेकवाहिनी एकत्रित काम करतात अशा ठिकाणी दोन्हींचा प्रभाव वाढतो.
आणि
कॉलेज प्रशासनासाठी महत्वाची बाब म्हणजे NAC च्या मूल्यांकनात
विवेकवाहिनीच्या उपक्रमांची विशेष दखल घेतली जाते. ज्याचा महाविद्यालयांना फायदा
होतो.
(चौघींच्या
चेहर्यावर कौतुक आणि समाधान दिसत होते. आणि ते पाहून माझे मन प्रसन्न झाले होते.)
एक:
अंकल, आम्ही
आमच्या कॉलेजमध्ये विवेकवाहिनी जरूर सुरू करू.
मी:
नक्की सुरू करा. काही मदत लागली तर मला कधीही कॉल करा. आता मी खरंच थांबतो.
एकावेळी जास्त खाल्लं तर अपचन होतं असं तुमचाच वैद्यकशास्त्राचा नियम सांगतो.
सर्वजणी:
हो अंकल. Thank you very much.
(खरंतर
धावत्या ट्रेनमधून गोंदिया नागपूरचा परिसर मला न्याहाळायचा होता. ती संधी हुकली
होती. पण या भावी डॉक्टरांच्या बरोबर चर्चा करून त्याच्यापेक्षा अधिक समाधान मला
मिळाले होते. इतके की हा संवाद मला लिहून या स्मृती कायमच्या कोरून ठेवाव्या
वाटल्या. या इच्छेपायी नागपूर पासून बुलढाणा जिल्ह्यातील नागपूरपर्यंत ना डोकं
मोबाईल मधून बाहेर काढता आलं ना शेजाऱ्यांशी बोलता आलं. तरीपण याचाही आनंदच आहे.)
...कृष्णात
स्वाती 8600230660 [ Collected Article ]
No comments:
Post a Comment