Thursday, 2 February 2017

कविता...तुझ्या नि माझ्या जीवनाची



एखाद्या रात्री कधीतरी
जमा होतात सावल्या,
गरम होतात डोळे नि
तडतडतात बाहुल्या...
मुक्यानेच सांगू लागतं
दुखलेलं पाणी,
इतकं हळवं चुकूनसुद्धा
असू नये कोणी..."
गाऊ नये कोणी कधी
उदास उदास गाणी,
कळावीत सारी दुःखं
इतकं होऊ नये ज्ञानी...
वाचूच नये मुळात कुठलं
जाडजूड पुस्तक,
विचारांपासून शक्यतो
दूर ठेवावं मस्तक...
जशी नजरेस दिसतात
तशीच पहावीत चित्रं,
जसे आपल्याशी वागतात
तसेच समजावेत मित्र...
उगाच फार खोल आत
नेऊ नये दृष्टी,
खऱ्या समजाव्यात
साऱ्या सुखांताच्या गोष्टी...
पेनाच्या जिभेवरच
सुकू द्यावी शाई,
फार त्रास होईल
असं लिहू नये काही...
हळवं बिळवं करणारे
मुळात जपूच नयेत छंद,
करून घ्यावीत काळोखाची
सगळी दारं बंद...
सायंकाळी एकटं एकटं
फिरू नये दूर,
समुद्रकिनारी लावू नये
आर्त, उत्कट सूर...
चालू नये सहसा फार
ओळखीची वाट,
भेटलंच अगदी कुणी
तर मिळवावेत हात...
जमल्यास चारचौघात
बघावं थोडं मिसळून,
लहान मुलासारखं कधीतरी
भांडावं उसळून...
आवडणार नाही
पंचमीच्या चंद्राची कोर,
एवढंसुद्धा कोणी कधी
होऊ नये थोर...
घट्ट घट्ट बसलेल्याही
सुटतातच गाठी,
कपाळावर म्हणून सारखी
आणू नये आठी...
साकळू देऊ नये फार
खोल खोल रक्त,
कुणापाशीतरी नियमित
होत जावं व्यक्त...
माणसांचं मनास
लावून घेऊ नये फार,
होऊ द्यावा थोडा हलका
त्यांचासुद्धा भार...
तुटून जावीत माणसं
एवढं पाळू नये मौन,
वरचेवर करत जावा
प्रत्येकालाच फोन...
ठेऊ नये जपून
वहीत पिंपळाचं पान,
साध्यासुध्या गोष्टीत
असा गुंतवू नये प्राण...
जमा होत राहील
सारखा पापणीआड थेंब,
इतकंसुद्धा मन लावून
करू नये प्रेम...
श्वास घेणंसुद्धा अगदीच
वाटू लागतं व्यर्थ,
शोधत बसू नये म्हणून
जगण्याचा अर्थ...
वाटलं जर केव्हा
सगळं सगळं आहे शून्य,
आहे हे असं आहे
हे करून घ्यावं मान्य..
इतकं समजावूनसुद्धा
जमा होतात सावल्या,
गच्च गच्च होतात डोळे,
थरथरतात बाहुल्या........
( संकलन )


No comments:

Post a Comment