चाळिशी मायक्रोसॉफ्टची...!
‘विंडो’ उघडल्याशिवाय कॉम्प्युटरच्या दुनियेची सकाळ
होत नाही. एवढी सर्वव्यापी बनलेल्या मायक्रोसॉफ्ट कंपनीला नुकतीच (४
एप्रिल) चार दशकं पूर्ण झाली. संपूर्ण जगाला नवी दिशा देणाऱ्या या कंपनीचा
प्रवास थक्क करणारा आहे, तसंच खूप काही शिकवणाराही. संगणकांच्या सॉफ्टवेअर
क्षेत्रात ही कंपनी अद्याप ‘दादा’ आहे; पण हीच स्थिती कायम राहणार का?
मायक्रोसॉफ्टच्या कामगिरीचा मागोवा...
‘अवर इंडस्ट्री डज नॉट रिस्पेक्ट ट्रॅडिशन- इट ओन्ली रिस्पेक्ट्स
इनोव्हेशन.’ मायक्रोसॉफ्टचा सीईओ म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर सत्या नडेला
यांच्या पहिल्या भाषणातलं हे विधान खूपच गाजलं. ‘परंपरा विसरा, नव्याचा
शोध घ्या’ असा अर्थ कुणी काढला, तर काहींनी त्याकडं आणखी वेगळ्या नजरतून
पाहिलं.
आपणास ‘एमएस डॉस’ माहिती आहे का? बरं, विंडोज वन माहितेय
का? बरं जाऊ द्या, विंडोज ९५, ९८. पण विंडोज एक्सपी निश्चितच माहिती
असणार, कारण ते अलीकडेच ‘आउटडेटेड’ झालं आहे.
या प्रश्नांची उत्तरं
शोधताना सत्या नडेला यांच्या विधानामध्ये किती तथ्य आहे, हेच अधोरेखित
होईल. कारण दिवसभर संगणकविश्वात रमणाऱ्या आजच्या पिढीला ‘एमएस डॉस’
माहितीच नाही, त्यात त्यांना रसही नाही. मात्र पुढं काय येत आहे जेणेकरून
माझं आजचं काम अधिक सुलभ कसं होईल, याकडं मात्र त्यांचं लक्ष आहे. म्हणूनच
‘इनोव्हेशन्स’ला या क्षेत्रात सर्वाधिक महत्त्व आहे.
सत्या यांच्या विधानाकडं चिकित्सकदृष्ट्या पाहिलं तर लक्षात येईल की,
संगणकीय दुनियेत निजदिनी नावीन्यकरणाला महत्त्व आहे. जो यात मागे पडला, तो
स्पर्धेतून बाद झाला. ‘जुने जाऊ द्या मरणालागूनि’ ही उक्ती इथं रोजच लागू
आहे. येणारा प्रत्येक दिवस काही तरी नवं घेऊन येत आहे, त्याचबरोबर जुन्या
अनेक बाबी, मग त्या चांगल्या असल्या तरी बाद होत आहेत. मायक्रोसॉफ्ट या
स्पर्धेत खूपच आघाडीवर होती, अद्यापही आहे. कसा झाला हा प्रवास?
बिल
गेट्स आणि पॉल ॲलन यांनी १९७५ मध्ये मोजक्या कर्मचाऱ्यांसह
‘मायक्रोसॉफ्ट’ची स्थापना केली. अल्टेअर ८८०० या डेस्कटॉप कॉम्प्युटरसाठी
सॉफ्टवेअर बनविण्याचं काम त्यांना मिळालं होतं, तेव्हापासून या कंपनीचं
मुख्य लक्ष्य सॉफ्टवेअर निर्मिती हेच राहिलं ते २०१२ पर्यंत. विशेषत:
ऑपरेटिंग सिस्टीम हेच त्यांचे प्रमुख सॉफ्टवेअर राहिलं. १९८०मध्ये बिल आणि
पॉल यांनी सर्व प्रकारच्या आयबीएम कॉम्प्युटरसाठी ‘एमएस डॉस’ हे सॉफ्टवेअर
बाजारात आणलं. २८६, ३८६ ते ४८६ प्रोसेसरपर्यंत ‘डॉस’ आणि नंतर विंडोजशिवाय
कॉम्प्युटरचं पान हलत नसे.
मायक्रोसॉफ्टचा व्याप वाढत जाऊ लागला तसा, गेट्स यांना हार्वर्डचा आपला
जुना मित्र स्टीव्ह बाल्मरची आठवण झाली आणि गेट्स व पॉल यांनी बाल्मरला
कंपनीत घेतले, १९८० चा तो काळ होता. इथून पुढं या त्रिकुटानं
‘कॉम्प्युटिंग’ दुनियेत मोठी क्रांती केली. पहिलं विंडोज सॉफ्टवेअर आलं
१९८३ मध्ये. त्याची कथाही रंजक आहे. वास्तविक हार्डवेअर आणि प्रोगॅम्स या
दोन्हींमध्ये इंटरफेस सॉफ्टवेअर (सांधणारा दुवा) निर्माण करण्यासाठीच
मायक्रोसॉफ्टचा जन्म झाला होता, त्यामुळं नव्या सॉफ्टवेअरला ‘इंटरफेस
मॅनेजर’ असेच संकेतनाम (कोडवर्ड) देण्यात आलं होतं. परंतु या प्रणालीचं
दृश्य स्वरूप एका पाठोपाठ एक करत उघडणारे ‘बॉक्सेस’ असं असल्यानं गेट्स
यांनी त्याचं नामकरण ‘विंडोज’ असं केलं. पहिलं विंडोज सॉफ्टवेअर ‘डॉस’
आधारित होतं. ते अधिक सुलभ झालं १९८५ मध्ये ‘विंडोज १’च्या सादरीकरणानंतर.
रायटर, नोटपॅड, कॅल्क्युलेटर, कॅलेंडर आदी सुविधा त्यात देण्यात आल्या.
‘डॉस कमांड’ऐवजी माउसनं टिचकी मारून विविध ‘विंडो’मधून प्रवास करता येऊ
लागला. त्याच्या लोकप्रियतेमुळे विंडोज २ आलं, सोबत ‘कंट्रोल पॅनल’ घेऊनच.
ते इंटेल २८६ प्रोसेसरवर चालणारे होते. पुढे प्रोसेसरमध्ये संशोधन होत गेलं
तसे विंडोजदेखील नव्या रूपात अवतरू लागले आणि अखेर ती वेळ आली. १९८८ मध्ये
कॉम्प्युटर सॉफ्टवेअरमध्ये जगातली सर्वांत मोठी कंपनी म्हणून
‘मायक्रोसॉफ्ट’ची इतिहासात नोंद झाली.
ऑगस्ट १९९५ मध्ये ‘विंडोज ९५’ची घोषणा
करण्यात आली. विंडोजचा हा नवा अत्याधुनिक अवतार होता. पहिल्यांदाच त्यात
इंटरनेट सुविधेसोबतच फॅक्स, मोडेम, ई-मेलसाठी ‘आउटलूक एक्स्प्रेस’ आणि
मल्टिमीडिया गेम्सदेखील होते. याशिवाय ‘प्लग एन प्ले’ सुविधेमुळं कोणतेही
अन्य सॉफ्टवेअर कॉम्प्युटरमध्ये सहज लोड करता येत होते. एव्हाना कॉम्प्युटर
आणि विंडोज हे समीकरण बनलं, पुढं विंडोज ९८, विंडोज २००० आणि विंडोज
एक्सपी आलं. ‘एक्सपी’ सर्वाधिक काळ स्थिर राहिलेलं व वापरलं जाणारं
सॉफ्टवेअर ठरले. त्यात सुरक्षेसंदर्भात काही त्रुटी होत्या, त्यासाठी
‘विंडोज व्हिस्टा’ मोठ्या जाहिरातबाजीनं सादर करण्यात आले. मात्र कंपनीची
अडचण इथंच झाली. ‘व्हिस्टा’मधल्या अनेक त्रुटी समोर येऊ लागल्या.
कॉम्प्युटर ग्राहक नाराज होऊ लागले व अन्य पर्यायांचा शोध घेऊ लागले. कोणी
लिनक्सकडं वळले, तर कोणी ‘ॲपल’कडं. ‘विंडोज’ किलकिल्या होऊ लागल्या.
म्हणून गडबडीनं विंडोज -७ आणलं. व्हिस्टाचा अनुभव जमेशी असल्यानं ‘विंडोज
-७’ची चाचणी तब्बल ८० लाख ग्राहकांनी ऑनलाइन घेतल्याचा कंपनीचा दावा आहे.
दोनच वर्षांनी विंडोज ८ सीरिज आली. सध्या मायक्रोसॉफ्टची ‘विंडोज क्रांती’
८.१ पर्यंत येऊन थांबलेली आहे. सॉफ्टवेअरखेरीज कंपनीची इतरही अशा स्वरूपाची
उत्पादने आहेत, उदा. बिझनेस एंटरप्राईस सोल्युशन्स, क्लाउड कॉम्प्युटिंग
इत्यादी, मात्र ‘एक्स बॉक्स’ हे गेमिंग कन्सोल ‘विंडोज’नंतर सर्वाधिक
लोकप्रिय ठरले.
दरम्यानच्या काळात, गुगलच्या अँड्रॉईडने मोबाईल
फोन्सच्या क्षेत्रात धुमाकूळ घातला. अँड्रॉईड मोबाईलने एवढी लोकप्रियता
मिळवली, की तो संगणकाला पर्याय ठरू लागला. टॅबलेट मोबाईल आल्यानंतर तर
डेस्कटॉप कॉम्प्युटरची दुनिया छोटी होऊ लागली, याची जाणीव मायक्रोसॉफ्टला
२०१२ मध्ये झाली आणि त्यांनी नोकिया या मोबाईल फोनच्या उद्योगातल्या मोठ्या
ब्रॅंडचा ताबा घेतला. आपण सॉफ्टवेअरसोबत उपकरणांच्या क्षेत्रातही
उतरण्याची गरज आहे, असा साक्षात्कार या कंपनीला झाला. ‘विंडोज मोबाईल’
मार्केटमध्ये उतरवण्यात आला. ॲपलचे जसे अत्यंत निष्ठावान वापरकर्ते आहेत,
तसेच विंडोज मोबाईलचेही आहेत. मात्र ॲपल पीसी आणि मोबाईल ग्राहकांच्या
तुलनेत मायक्रोसॉफ्टकडं अशा ग्राहकांची संख्या खूपच कमी आहे. नोकियावर ताबा
मिळवण्यापूर्वी कंपनीनं सरफेस टॅबलेट पीसी आणला होता, मात्र टॅबलेटच्या
दुनियेत खूपच पर्याय उपलब्ध असल्यानं त्याचा फारसा टिकाव लागला नाही.
२००९ आणि २०१३ वगळता मायक्रोसॉफ्टचा
विकास वेगानं झाला आहे. या दोन्ही वर्षांत मात्र कंपनीची घसरण झाल्यानं
महसूल वाढीचा दर (उणे) घटला होता. २००५ मध्ये कंपनीने तब्बल ५० टक्के
विकासदर गाठला होता, तेवढा वेग नंतर कधीही गाठता आलेला नाही. अलीकडच्या
काळात तर तो १ ते ५ टक्क्यांच्या आसपास आहे. २००० मध्ये गेट्स बाजूला
झाले आणि त्यांनी बाल्मर यांच्या खांद्यावर अध्यक्ष व सीईओपदाची धुरा
सोपवली. बाल्मर यांचा कालखंड प्रचंड स्पर्धेचा राहिला. त्यांनी पदभार
स्वीकारला त्या वर्षी म्हणजे २००९ मध्ये निव्वळ उत्पन्न १८ टक्क्यांनी
घसरलं होतं. त्यांच्या जागी सत्या नडेला आले तेव्हा कंपनीचे निव्वळ उत्पन्न
१४ अब्ज डॉलरवरून २२ अब्ज डॉलरवर गेलं होतं. तब्बल १ लाख २३ हजार कर्मचारी
असलेल्या या कंपनीच्या उत्पन्नाचा सर्वांत मोठा वाटा ‘ओएस’ (ऑपरेटिंग
सिस्टीम) विक्रीतूनच येतो. त्यानंतर क्रमांक आहे क्लाउड आणि सर्व्हरचा.
इंटरनेट, सॉफ्टवेअर, ऑनलाइन सोल्युशन्समध्ये मायक्रोसॉफ्टला गुगल मोठा
स्पर्धक आहे, फोर्ब्सच्या आकडेवारीनुसार गुगलचं गेल्या आर्थिक वर्षाचं
निव्वळ उत्पन्न १५ अब्ज डॉलरच्या घरात होतं. हार्डवेअर व सॉफ्टवेअरमधील
सर्वांत मोठी स्पर्धक असलेली जगातील बलाढ्य कंपनी ‘ॲपल’नं मायक्रोसॉफ्टला
केव्हाच मागं टाकत निव्वळ उत्पन्नाचा ४९ अब्ज डॉलरचा पल्ला गाठला आहे.
सत्या नडेला यांच्या नेतृत्वाखाली ‘मायक्रासॉफ्ट’ची सफर कशी होते हेच आता
पाहायचे आहे. चाळिशीनंतर मानवी आयुष्यात सेकंड इनिंग सुरू होते असं मानतात.
मायक्रोसॉफ्ट आता महत्त्वाच्या टप्प्यावर उभी आहे. नडेला कंपनीला कुठं
नेतात, ते पाहणं उत्कंठावर्धक ठरेल.
कॉम्प्युटर विश्वातील ‘ओएस’ विकासाच्या
स्पर्धेला टक्कर देण्यासाठी मायक्रोसॉफ्टनं जानेवारीच्या अखेरीस ‘विंडोज
१०’ सादर केलं. विंडोज ८ च्या तुलनेत यात खूपच बदल करण्यात आले आहेत आणि
विशेष म्हणजे ‘स्टार्ट मेनू’ पुन्हा ‘स्टार्ट’ बटनवर देण्यात आला आहे.
विंडोज ७ आणि विंडोज ८ साठी विंडोज १० चे अपडेट मोफत असेल. त्यात इंटरनेट
एक्स्प्लोररचा अत्याधुनिक अवतार ‘इंटरॲक्टिव्ह’ करण्यात आला आहे.
नेटविश्वात फिरताना तुम्हाला आवडलेल्या साईट्स, फोटो किंवा अन्य काही
तुम्ही अधोरेखित करू शकाल आणि इतरांना पाठवू शकाल.
हा एक विलक्षण चष्मा आहे, तो परिधान
केला की नवे आभासी जग तुमच्यासमोर उभे राहील, ते तुम्ही केवळ तुम्ही पाहूच
शकणार नाही, तर त्यात स्वत: सहभागी होऊ शकाल. कोणाला गुगल ग्लास वाटेल पण
त्यापेक्षा खूप पुढचं हे प्रकरण आहे. विंडोज १० सादर करताना आभासी विश्व
उभे करणारा ‘हॉलोलेन्स’ हा जादूई चष्माही सादर करण्यात आला. सत्या नडेला
यांनी सीईओ म्हणून सूत्रे स्वीकारल्यानंतर या दोन मोठ्या घोषणा आहेत.
विंडोजनं संगणक क्षेत्रात क्रांती केली. आता आभासी विश्वात हॉलोलेन्स
नक्कीच क्रांती करतील अशी आशा आहे. गुगल ग्लास किंवा ॲक्युलस रिफ्टपेक्षा
हॉलोलेन्स खूप वेगळा चष्मा आहे. ग्लास किंवा ॲक्युलसला कॉम्प्युटर -
मोबाईल कनेक्शनची गरज लागते. हॉलोलेन्स स्वतंत्र आहे, त्याला बाहेरच्या
कनेक्शनची गरज नाही. शिवाय तो हातवारे आणि आवाज ओळखतो व कमांड स्वीकारतो.
या चष्म्याद्वारे रिकाम्या पोकळीत (हवेत), भिंतीवर किंवा कोणत्याही वस्तूवर
‘थ्री-डी’ स्क्रीन निर्माण करता येतो. तुम्ही जिकडे जाल तिकडे हा स्क्रीन
तुमच्या सोबतच येतो. या चष्म्यासाठी खास ‘हॉलो स्टुडिओ’ही बनवण्यात आला
आहे. विंडोजमधील पेंटब्रशची ही अत्याधुनिक ‘थ्री-डी’ आवृत्ती आहे. त्यात
तुम्ही आभासी दुनियेत कोणत्याही स्वरूपाचं डिझाईन बनवू शकता, एवढेच नाही तर
ते ‘सेव्ह’ करून त्याची थ्री-डी प्रिंटही घेता येऊ शकते. म्हणूनच ते
क्रांतिकारी ठरेल, असा नडेला यांचा विश्वास आहे. या चष्म्याची विक्री
एप्रिलअखेर सुरू होण्याची शक्यता आहे.
- मायक्रोसॉफ्ट कंपनीचे संस्थापक बिल गेट्स आपला सहकारी पॉल ॲलनसमवेत..!
-
-
-
-
- I read above story about 'Microsoft' in Sakal marathi daily news-paper. This is very inspirable to youngs. So, I tried to give the story as it is given in " Sakal-Saptarang " suppliment..! I request to all my faithful friends for reading this story carefully & tried to make our own opinion about ourself future..!
- thanx to Sakal and Mr. Nandkumar Sutar sir..!
No comments:
Post a Comment