Monday, 27 June 2016

एक चित्रकार होता...

एक चित्रकार होता.
गुरूचा सर्वात आवडता शिष्य आणि उत्कृष्ट चित्रकार असूनही त्याला कोणताही गर्व नव्हता.
गुरू व स्वत:च्या  कलेवर त्याला प्रचंड विश्‍वास होता.

पण स्वत:वर त्याचा विश्‍वास फारसा नसावा.
तीन दिवस परिश्रम करून त्याने एक सुंदर चित्र काढले. पण ‘आपले चित्र चांगले आहे का?’
हा प्रश्‍न त्याला कुणाला तरी विचारावासा वाटला.

एका गजबजलेल्या रस्त्यावर त्याने त्याचे ते चित्र लावले. त्याखाली एक पाटी लावली,
मी हे काढलेले चित्र तुम्हाला कसे वाटले?
यात कुठेही चूक वाटली तर त्याजागी एक छोटीशी फुल्ली मारा.’

लोकांनी काय प्रतिक्रिया दिली असेल हे पाहण्याकरता संध्याकाळी तो पोहोचला.
संपूर्ण चित्र फुल्ल्यांनी भरलेले पाहून त्याचे डोळे भरले. काही लोकांनी तर चुका काय तेही लिहिले होते. चित्रकाराचा जीव तुटला. तो धावत आपल्या गुरूकडे गेला आणि म्हणाला,
‘मी हरलो.
मी खूप वाईट चित्रकार आहे.
मी चित्रकला सोडायला हवी.
मी संपलो.’

हे ऐकून गुरूने म्हटले,
‘तू व्यर्थ नाहीस.
तू फार चांगला चित्रकार आहेस.
मी ते सिद्ध करू शकतो.
असेच सारखे एक चित्र काढ आणि माझ्याकडे घेऊन ये.

तसेच चित्र परत काढून चित्रकार दोन दिवसांनी गुरूकडे आला. गुरू त्या चित्रकाराला परत त्याच गजबजलेल्या रस्त्यावर घेऊन आला. ते चित्र परत रस्त्यावर ठेवले आणि खाली एक पाटी लिहिली,
‘मी हे चित्र काढले आहे. काही चुका आहेत असे वाटले तर बाजूला ठेवलेल्या रंगांनी त्या चुका दुरुस्त करा.’ ही पाटी लावून ते दोघे निघाले.

संध्याकाळी परत जाऊन त्यांनी पाहिले तर कुणीही त्या चित्राला हातदेखील लावला नव्हता.
सहा-आठ दिवस ते चित्र तसेच राहिले.

यावर गुरू म्हणाले,
‘फुल्ल्या मारणे सोपे असते,
पण दुरुस्ती करणे कठीण असते.’

दुनियेच्या कोर्टात स्वत:ला उभे करू नका.
सगळ्यांची मतं ऐका,

पण इतरांच्या मतांनी तुटू नका.
मी कोण आणि कसा
हे पहिल्यांदा स्वत:ला विचारा...

आपला आत्मविश्वास सगळयात महत्वाचा...                                                          ( संकलित )

Friday, 17 June 2016

पाणी बचतीचा महत्वाचा उपाय...

                                    पावसाळा ऋतु सुरु झाला तरी सध्या महाराष्ट्र आणि भारतातील काही भागात भीषण पाणी टंचाई ( दुष्काळ परिस्थिती ) जाणवत आहे. त्या संदर्भात आपणास काही उपाययोजना करता येईल याबाबतची महत्वाची माहिती......

इस्राईलने जाणले पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे महत्त्व.
      पाण्याचे दुर्भिक्ष, वाळवंटी भूभागाचा मोठा पट्टा, अत्यंत कमी पाऊस अशा प्रतिकूल गोष्टींशी टक्कर देत इस्राईलने उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करून कृषी प्रगती साधली आहे.

                  इस्राईलचा शेतकरी 1000 लिटर पाण्यापासून 70 रुपये उत्पन्न मिळवितो.
      पूर्वी त्यांना 1000 लिटर पाणी वापरातून 18 रुपयांचे उत्पन्न मिळत होते.
        सध्या नवीन तंत्रज्ञानाचा वापर केल्याने उत्पादन चौपट वाढ झाली आहे.
            इस्राईलमध्ये पावसाचे पाणी भूगर्भात साठविण्यासाठी प्रभावीपणे अंमलबजावणी केली जाते.
या साठविलेल्या पाण्यातून देशाची 60 टक्के पाण्याची गरज भागविली जाते.
इस्राईलमध्ये भूगर्भातील पाणीसाठ्याची दोन महत्त्वाची ठिकाणे आहेत.
            यामध्ये समुद्र किनाऱ्याजवळील झरे (ऍक्विफर) आणि दुसरा पर्वतीय विभागातील झऱ्यातून पाणीसाठा तयार केला जातो.
           याशिवाय उत्तरेकडील गोलन टेकड्या व पश्‍चिमेकडील किनरेट तळ्याजवळ लहान शेकडो झरे आहेत.
                समुद्रकिनाऱ्याजवळील झऱ्यातून दरवर्षी सुमारे 25 कोटी घनमीटर व पर्वतीय विभागातील झऱ्यातून सुमारे 35 कोटी घनमीटर पाणी उचलले जाते.
                समुद्रकिनाऱ्याजवळील झऱ्यातून प्रमाणापेक्षा जास्त पाणी उचलल्यास गोड्या पाण्याची पातळी खाली जाते.
    त्यामुळे ऍक्विफरमध्ये खारे पाणी मिसळून क्षाराचे प्रमाण वाढते. पाणी वापरण्यायोग्य राहत नाही.
        झऱ्याच्या साठ्यातून उचललेल्या जादा पाण्याची योग्य पातळी राहावी म्हणून किनरेट तलावात पावसाळ्यात जादा झालेले पाणी बंदिस्त पाइपमधून झऱ्यांच्या साठ्यात सोडले जाते.
           अवर्षणाच्या वेळी जादा उचलले पाणी पावसाळ्यात पुनःश्‍च त्या पातळीवर आणणारा इस्राईल हा जगातील एकमेव देश आहे.
   या दोन झऱ्याशिवाय इस्राईलमध्ये भूपृष्ठात पाणीसाठा करण्यासाठी सुमारे 2800 विहिरी असून 150 कूपनलिका आहेत.
            यामधील काही विहिरी व बोअरवेल्स खास अवर्षणाच्या वेळी उचललेल्या पाण्याचे हिवाळ्यात पुनर्भरण (रिचार्ज ऑफ वॉटर) करण्यासाठी ठेवल्या आहेत.
याशिवाय भूपृष्ठावरील पावसाळ्यात वाहणारे पाणी वाया जाऊ नये म्हणून लहान लहान तळी व तलावांची मोठ्या प्रमाणात उभारणी केली आहे.
      इस्राईलमध्ये हिवाळ्यात म्हणजे नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी महिन्यात पाऊस पडतो.
2) किनरेट तलाव (सी ऑफ गॅलीली)
        इस्राईलमधील गोड्या पाण्याचा एकमेव आणि मोठा तलाव जॉर्डन नदीवर नैसर्गिक खच दरीतून निर्माण झाला आहे.
    हा तलाव नैसर्गिकरीत्या खचलेल्या भागात म्हणजे समुद्रसपाटीपेक्षा 740 फूट खोलीवर असल्याने जॉर्डन नदीचे पाणी येथे मोठा बंधारा न बांधता साठून राहते.
          या तलावाची एकूण क्षमता 400 कोटी घनमीटर असून, या तलावातून दरवर्षी 50 कोटी म्हणजे देशाच्या एकूण गरजेच्या 25 टक्के पाणी वापरासाठी घेतले जाते.
            इस्राईलला वार्षिक सुमारे 200 कोटी घनमीटर पाणी लागते.
             तलावाचा संपूर्ण साठा वापरावयाचा झाल्यास या तलावाचे पाणी इस्राईलला दोन वर्षं पुरेल.
    तथापि, बाष्पीभवनाने वाया जाणारे पाणी, तसेच पुढील वर्षी कदाचित पाऊस पडला नाही तर दुष्काळ विचारात घेऊन ते एकूण क्षमतेच्या 25 टक्के पाणी वापरले जाते.
      सर्वांत महत्त्वाचे म्हणजे दरवर्षी 50 कोटी घनमीटर पाणी उचलून 350 कोटी घनमीटर पाण्याची पातळी कायम ठेवली जाते.
         किनरेट तलाव इस्राईलमधील पाण्याचा राखीव साठा आहे.
          तलावातील मर्यादित पाणी पुरवून कसे वापरावे याचे किनरेट तलाव उत्तम उदाहरण आहे.
           या तलावाची लांबी 21 किलो मीटर व रुंदी आठ किलोमीटर आहे.
     पुनर्वापरात आणलेल्या पाण्यातून घरगुती वापर व उद्योगधंद्यांसाठी पाण्यावर सुमारे 70 टक्के प्रक्रिया करून शेतीच्या वापरासाठी दिले जाते.
           त्यामुळे देशाची एकूण 15 टक्के गरज भागविली जाते.
      इस्राईलमध्ये पुरवठा केलेल्या पाण्यापैकी 60 टक्के पाणी शेतीसाठी, दहा टक्के पाणी उद्योगधंद्यासाठी व 30 टक्के पाणी घरगुती वापरासाठी दिले जाते.
                    शेतीसाठी कराव्या लागणाऱ्या पाणीपुरवठ्यासाठी पाणीपुरवठा कंपनीस 1000 लिटर पाण्यास दहा रुपये इतका खर्च येतो.
शेतकऱ्यांना शेतीसाठी द्यावयाच्या पाण्यास सरकारमार्फत 50 टक्के अनुदान दिले जाते.
                  इस्राईलचा शेतकरी 1000 लिटर पाण्यापासून 70 रुपये मिळवितो. पूर्वी त्यांना 1000 लिटर पाणी वापरातून 18 रुपयांचे उत्पन्न मिळत होते. परंतु सध्या नवीन तंत्रज्ञानाचा वापर केल्याने उत्पादनात चौपट वाढ झाली आहे.
     आपल्या शेतकऱ्यांनी आणि सरकारने या गणिताचा जरूर विचार करावा.
इस्राईलमध्ये शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याचा पीक पद्धतीनुसार कोटा ठरवून दिला जातो.
    ठरवून दिलेल्या कोट्याप्रमाणे शेतकऱ्यांनी पाणीपुरवठा करणे त्यास बंधनकारक आहे.
    तथापि, ठरवून दिलेल्या कोट्यापेक्षा जादा पाणी हवे असल्यास शासनाकडे तशी मागणी करावी लागते.
         शासन पाण्याच्या आवश्‍यकतेची खात्री करून नेहमीपेक्षा दुप्पट दराने पाणीपुरवठा करते.
             पाण्याच्या अशा प्रकारे प्रचंड मर्यादा असल्याने प्रत्येक शेतकऱ्याने नियोजनबद्ध रीतीने ठिबक व फवारा सिंचन पद्धतीचा पीक प्रकारानुसार 100 टक्के वापर केलेला आहे.
          प्रत्येक शेतकऱ्याने आवश्‍यक शेतावर पाणीपुरवठ्यासाठी स्वयंचलित संगणक बसविला आहे.
   
    त्यामुळे शेतीस आवश्‍यक तेवढे पाणी दिले जाते. या देशात पाटाने अजिबात पाणी दिले जात नाही. पण पाणी निश्‍चितपणे पाहिजे त्या वेळी मिळते.

              नाहीतर आपणाकडे पाण्याची पाळी 15 दिवसांपासून एक महिन्यापर्यंत कशीही लांबते.
   याचा परिणाम प्रति एकरी उत्पन्नावर होतो.
फिल्टरचे तंत्रज्ञान :-

             ठिबक सिंचन पद्धतीमध्ये फिल्टरला अतिशय महत्त्व आहे.
             ठिबक संच बसविण्यापूर्वी पाण्याची गुणवत्ता व दर्जा कोणत्या प्रकारचा आहे हे विचारात घ्यावे लागते.
           इस्राईलमध्ये फिल्टरेशन तंत्रज्ञान खूप विकसित झाले आहे.
त्यासाठी त्यांनी दर्जेदार, टिकावू व कार्यक्षम फिल्टर तयार केले आहेत.
    पाणी कितीही प्रदूषित असले तरी अतिशय वेगाने ते फिल्टरमध्ये आत घेतले जाते.
            आतील जाड चकत्या वेगाने फिरतात त्यामुळे स्वच्छ पाणी खाली पाइपमध्ये येते व पाण्यातील घाण फेसासारखी वरच्या भागात साठविली जाते व ठराविक वेळेला विरुद्ध दिशेकडून पाण्याचा प्रवाह येऊन घाण व्हॉल्व्हद्वारे बाहेर टाकली जाते व फिल्टर आपोआप साफ केला जातो.
ड्रीपरचा वापर :-
           इस्राईलमध्ये ठिबक संच तयार करता असताना तो सहज, सुलभ वापरायोग्य व कमीत कमी देखभाल लागेल असे तयार केले जातात.
                  पाइपच्या बाहेर ड्रीपर असल्यास ते पाइप शेतात अंथरताना किंवा काढताना मोडण्याची, तुटण्याची शक्‍यता असते.
कारण इस्राईलमध्ये पाइप टाकणे किंवा परत गोळा करणे ही कामे यंत्रामार्फतच केली जातात.
         याकरिता त्यांनी इनलाईन ड्रीपर पद्धती शोधून काढली आहे.
      इस्रायली कंपनीने एका विशिष्ट प्रकारच्या ड्रीपरची निर्मिती केली असून पाणी देणे बंद केल्याबरोबर ड्रीपरमधून पाणी बाहेर पडण्याचे थांबते.
        त्यामुळे पाइपमधीलही पाणी वाया जात नाही किंवा पिकास जास्त दिले जात नाही.

     या तंत्रामुळे पाण्याची लक्षणीय बचत होते कारण ग्रीन हाऊसमध्ये पिके वेगवेगळ्या माध्यमांमध्ये घेतली जातात.
         पिकाच्या योग्य वाढीकरिता दिवसातून बऱ्याच वेळेला पाण्याचा वापर केला जातो.
    काही कंपन्यांनी एका वेळी 18 x 18 मीटर एवढ्या अंतरावरील पिकांना पाणी देता येईल असे तुषार संच बनविलेले आहेत.
            ठिबक सिंचनातून इस्राईलने अतिशय नेत्रदीपक प्रगती केलेली आहे.
   हजारो एकर फळबागा, फुलशेती, स्ट्रॉबेरीची शेती, ठिबक सिंचनावर डोलताना बहरताना दिसून आल्या.
     एवढेच काय त्यांनी रस्त्यावरील झाडांना, विमानतळावरील हॉटेलसमोरील लहान लहान झाडांनासुद्धा ठिबकनेच पाणी दिले आहे.
  याउलट आपण ठिबक सिंचनामध्ये म्हणावी तशी प्रगती करू शकलो नाही.
कारण आपल्याकडील शेतकऱ्यांना अद्यापही ठिबक पाणी पद्धतीचे महत्त्व पटलेले नाही.
    पाणी व्यवस्थापनाच्या फवारा पद्धतीमध्ये कायम स्वरूपी फवारा, फिरता फवारा, गन फवारा, गन फवारा, कमी दाबाचा फवारा, वैयक्तिक झाडापुरता छोटा फवारा, एका विशिष्ट दिशेने फिरणारा फवारा असे वेगवेगळे प्रकार असून एका वेळी 160 एकरांपर्यंत गोलाकार क्षेत्र फिरून भिजविणारा फवारा सिंचन हे येथील खास वैशिष्ट्य आहे.
         मुख्य पाइपवर बसविलेल्या तोट्यांच्या साह्याने पाणी सभोवार पिकावर फवारले जाते.
            हा फवारा संच शेतात कायमस्वरूपी बसविलेला असतो.
    मोटारच्या किंवा ट्रॅक्‍टरच्या साह्याने हा संच मागे पुढे पाहिजे त्या प्रमाणे हलविता येतो.

       सदरचा संच एका बाजूला स्थिर ठेवलेला असतो व दुसरी बाजू गोलाकार फिरून शेतामधील पिकास फवारा पद्धतीने पाणी दिले जाते.
आपल्या राज्यात पाण्याच्या नियोजनाबाबत भरपूर करता येणे शक्‍य आहे.
     इस्राईलच्या गोलन टेकड्या व उत्तरेकडील वातावरण आपल्या महाराष्ट्रातील कोकण विभाग, थंड हवेची ठिकाणे व डोंगरी भागातील वातावरणाशी काही प्रमाणात मिळते जुळते आहे.
    इस्राईलमध्ये उत्तरेकडे पाऊस 700 मि.मी. तर आपल्या या भागात 3000 ते 4000 मि.मी. एवढा प्रचंड पाऊस पडतो.
     असे असूनही पावसाळ्यात जास्त पाऊस पडणाऱ्या या भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई भासते.
  राज्यातील दुष्काळसदृश तालुक्‍यात वार्षिक 500 ते 600 मि.मी. एवढा पाऊस पडतो.
              याउलट इस्राईलमध्ये जास्त पाऊस पडणाऱ्या विभागात 600 ते 700 मि.मी. पाऊस पडत असूनही केवळ पाणी अडविण्याच्या व जिरविण्याच्या प्रभावी मोहिमेमुळे व पाण्याच्या नियोजनामुळे वर्षभर देशास पाणीपुरवठा करणे त्यांना शक्‍य झाले आहे.
संगणक नियंत्रित
ठिबक आणि फवारा सिंचन :--

     इस्राईलमध्ये सिंचन पद्धतीबाबत अतिशय सखोल अभ्यास करून संगणक नियंत्रित ठिबक व फवारा सिंचन पद्धतीचा वापर सुरू केला आहे.
               सिंचन व्यवस्थेकरिता इस्राईलच्या शास्त्रज्ञांनी प्रत्येक झाडाचे वैशिष्ट्य शोधून काढले आहे.
त्याच्या वयोमानाप्रमाणे तसेच जमिनीची प्रत, हवामान या सर्व बाबींचा बाराकाव्याने अभ्यास करून त्या झाडास पाणी किती व कधी लागेल त्या सर्व बाबी ठरविण्यात आल्या.
त्याची सर्व माहिती संगणकास पुरवून ठिबक सिंचनाचा संच संगणकास जोडला जातो.
    या संगणकाद्वारे पिकास आवश्‍यक तेवढेच व आवश्‍यक वेळी पाणी दिले जाते.
   ठिबक सिंचनाचा वापर करताना पाण्याच्या प्रत्येक थेंबाच्या जाडीचाही त्यांनी विचार केला आहे.
    एखाद्या झाडास साधारणपणे आठ तासात किती पाणी लागते, त्यासाठी किती जाडीचा थेंब व किती वेगाने तो ड्रीपरमधून बाहेर पडावा अशा प्रकारचे त्या ड्रीपरला छिद्र पाडली जातात.
            ठिबक सिंचन पद्धतीद्वारे द्रवरूप खते झाडाच्या मुळाजवळच दिली जातात.
        त्यामुळे खतांचा अपव्यय टाळून त्यांचा योग्य मोबदला मिळतो.
       रिमोट कंट्रोल बसविलेले संगणक हे काम माणसापेक्षा अतिशय बिनचूक व चांगल्या पद्धतीने करत असल्यामुळे संगणकाद्वारे पाण्याचे व्यवस्थापन करणाऱ्या काही संस्था इस्राईलमध्ये निर्माण झाल्या आहेत.
संगणक वापराचे फायदे :--
1) संगणक नियंत्रित पद्धतीत पिकांना पाणीपुरवठा दररोज ठराविक वेळेला व ठराविक कालावधीसाठी पिकाचे त्या दिवशीच्या आवश्‍यकतेनुसार केला जातो.  
                     त्यामुळे पाण्याची बचत होऊन उत्पादनवाढीस मदत होते.
2) संगणक पिकांना नियमित व अखंडपणे पाणीपुरवठा करत असताना आवश्‍यकतेनुसार व्हॉल्व्ह (झडपा) बंद व चालू करणे इ. कामे करतो.
           पिकाचा प्रकार, मातीचे गुणधर्म व त्या दिवशीचे असणारे हवामान, पाण्याची गळती, पाणी वाहण्याची गती, वीजपुरवठा या सर्व बाबींवर नियंत्रण ठेवून आवश्‍यक तेवढेच पाणी देतो.
3) संगणकामुळे खते योग्य प्रमाणात व योग्य वेळी दिली जाऊन त्यांची कार्यक्षमता वाढविता येते.
                 पाणी व खते एकाचवेळी दिल्यास पिकास आवश्‍यक अन्नद्रव्य योग्य प्रमाणात मिळतात.
             पाण्यातून खते देता यावीत यासाठी इस्राईलमध्ये सर्व प्रकारची खते द्रवरूप तयार केली जातात.
4) काही तांत्रिक दोषामुळे जास्त दाबाने पाणी आल्यास व त्यामुळे काही ठिकाणी पाइप फुटून पाणी वाहू लागल्यास संगणकाद्वारे त्या ठिकाणचे व्हॉल्व लगेच बंद केले जातात.
त्यामुळे पाण्याचा अपव्यय होत नाही.